कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय, केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचे आदेश
देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना तातडीने योग्य त्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात ६,१३३ सक्रिय रुग्ण आहेत. मागील २४ तासांत ६,२३७ रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा गंभीर होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचे ६६५ सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. केरळमध्ये ३, कर्नाटकमध्ये २ आणि तामिळनाडूमध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सर्व रुग्ण पुरुष होते आणि वय ४२ ते ९२ वर्षांच्या दरम्यान होते.
जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत देशात एकूण ६१ मृत्यू झाले आहेत. यामध्ये दिल्लीतील ७ मृत्यूंचा समावेश आहे. रविवारी सकाळपर्यंत देशात ५,७५५ सक्रिय रुग्ण होते आणि ५,४८४ रुग्णांनी बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला होता.
सध्याची परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी, वाढती प्रकरणं पाहता केंद्र सरकारने राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा सध्याचा प्रकार तुलनेने कमी घातक आहे, पण वृद्ध, लहान मुले आणि गंभीर आजारांनी त्रस्त लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
लसीकरण पूर्ण करणे, मास्कचा वापर, गर्दीपासून दूर राहणे आणि लक्षणे आढळल्यास चाचणी करणे हे उपाय अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.